आठवणी, संस्कार आणि सन्मानाचा अविस्मरणीय क्षण..!

आठवणी, संस्कार आणि सन्मानाचा अविस्मरणीय क्षण..!

नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्था येथे आयोजित संयुक्त पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. या प्रसंगी कर्मवीर कै. काकासाहेब वाघ, सहकार महर्षी कै. माधवराव बोरस्ते, कै. काकुशेठ उदेशी यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

या निमित्ताने अनेक आठवणींना उजाळा मिळाला. माझ्यासाठी के. के. वाघ शिक्षण संस्था ही केवळ शिक्षणसंस्था नसून माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी संस्कारभूमी आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी सलग दोन वेळा जनरल सेक्रेटरी म्हणून माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्या सार्वजनिक जीवनातील पहिला महत्त्वाचा टप्पा ठरला. नेतृत्व, जबाबदारी आणि समाजाशी जोडून राहण्याचे धडे याच संस्थेने दिले आणि त्यातूनच माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासाची पायाभरणी झाली.

आज त्याच संस्थेत विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणे आणि एकेकाळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ज्या व्यासपीठावर उभा राहत होतो, त्याच व्यासपीठावर आज विधानपरिषद सदस्य म्हणून उभे राहण्याचा योग येणे, हा अत्यंत भावूक करणारा क्षण ठरला. विधानपरिषदेवरील माझ्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने झालेला सत्कार हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून, मला घडवणाऱ्या या संस्थेचा, माझ्या शिक्षकांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचाच आहे.

या प्रसंगी आमदार मा. डॉ. राहुल आहेर, आमदार मा. श्री. दिलीपराव बनकर, नाशिकच्या महापौर मा. सौ. हिमगौरी आहेर-आडके, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस मा. श्रीमती नीलिमाताई पवार तसेच के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक मा. श्री. समीर बाळासाहेब वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या जिव्हाळ्याच्या सन्मानासाठी के. के. वाघ शिक्षण संस्था, व्यवस्थापन मंडळ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.

या संस्थेने दिलेले संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वास हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे खरे भांडवल आहे. आजचा हा सन्मान माझ्यासाठी गौरवापेक्षा अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या विश्वासाला पात्र ठरत समाजहित आणि जनसेवेसाठी अधिक समर्पित भावनेने कार्य करत राहणे, हाच माझा कायम प्रयत्न असेल.

📍के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *