आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे, सहअध्यक्ष खासदार श्री. निलेशजी लंके, जिल्हाधिकारी श्री. पंकजजी आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंदजी भंडारी, दिशा समितीचे सदस्य तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देत संबंधित विभागांकडून कामांचा आढावा घेण्यात आला. महावितरणच्या विविध समस्यांबाबत चर्चा करताना तालुक्यातील सर्व घरगुती वीज जोडण्या गावठाण फिडरवर जोडण्यासाठी आवश्यक सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) एका महिन्याच्या आत तयार करण्यात येईल, अशी ग्वाही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली.
जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांतील अडथळे तातडीने दूर करून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
केंद्र शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासह कांदा चाळ व शेततळे अस्तरीकरण व यांत्रिकीकरण या योजनांमध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यात यावी तसेच त्या दृष्टीने प्रभावीपणे नियोजन करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रस्तावांना बँकांकडून होणारा विलंब यावेळी निदर्शनास आणून देत. पात्र लाभार्थ्यांना वेळेत कर्ज मंजूर करून युवक आणि नवउद्योजकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळेल, यासाठी संबंधित बँकांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना करण्यात आल्या.
ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुसज्ज करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) – टप्पा ४ अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील पात्र रस्त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. जेणेकरून ग्रामीण भागातील दळणवळण अजून सुलभ होईल.
तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास कार्यक्रमात कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. भूजल पातळी वाढविणे, जलसंधारणाला चालना देणे, शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करणे आणि अल निनोमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे बाबत या बैठकीत स्पष्टपणे सांगितले.










